Wednesday, January 7, 2015

समलैगिंक, तृतीयपंथीयांना सन्मानाने वागवावे

समलैगिंक किंवा तृतीयपंथी असणे हे नैसर्गिक आहे. पण गैरसमजामुळे त्यांची समाजाकडून उपेक्षा होते. निकोप समाजासाठी त्यांना सन्मानाची वागणूक मिळणे गरजेचे आहे, असे मत 'आजचा सवाल'मध्ये व्यक्त झाले. समलैंगिक / तृतीयपंथी व्यक्तींच्या मानवी हक्कांची आपल्या देशात पायमल्ली होतेय का? असा आजच्या चर्चेचा विषय होता.


यात मानसोपचारतज्ज्ञ आशिष देशपांडे, ट्रान्सजेंडर कार्यकर्ती लक्ष्मी त्रिपाठी, समपथिक संघटनेचे अध्यक्ष बिंदुमाधव खिरे सहभागी झाले.


चर्चेत सुरुवातीला लक्ष्मी त्रिपाठी यांनी मुंबई जिमखाना पार्टीत झालेल्या अपमानाचा अनुभव सांगितला. ब्रिगेडिअर बोस यांनी मला पार्टीतून बाहेर काढायला सांगितल्यानंतर आम्ही निषेध करत पार्टी सोडली. पण हा प्रकार म्हणजे माझ्या आत्मसन्मानावर बलात्कार आहे, असे मी समजते. ब्रिटीशांच्या काळात यात जिमखान्यावर 'इंडियन ऍन्ड डॉग्ज आर नॉट अलाऊड' असा बोर्ड लावलेला होता. पण आता स्वातंत्र्यानंतरही सरकारला केवळ 1 रुपया भाडे देणार्‍या या जिमखान्यावर आमचा अशा प्रकारचा अपमान होणे ही लाजीरवाणी बाब आहे, असे लक्ष्मी म्हणाल्या.


तर खिरे म्हणाले, अगदी वयात आल्यापासून आमच्या खच्चीकरणास सुरुवात होते. इतरांना कळले तर आपले सर्व पातळ्यांवर खच्चीकरण होईल, याचे टेन्शन आल्यानेच अनेकजण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात.


देशपांडे म्हणाले, समलैंगिकता किंवा ट्रान्सजेंडर हे नैसर्गिक आहे. हे शास्त्रानेही ते सिद्ध केलेले आहे. पण आपल्याकडे या लोकांची उपेक्षा होते. त्यांच्यासाठी 'हिजडा' म्हणजे समाजात स्थान नसलेले असा शब्द सर्रास वापरला जातो. पण या लोकांमध्ये वेगवेगळ्या शारिरीक स्थिती असतात. इंग्रजीत त्या सगळ्यांना नावे ठरलेली आहेत. पण आपल्याकडे अजूनही त्याबाबत काहीही माहिती नाही. होमो, गे किंवा ट्रोन्सजेंडर हे नैसर्गिक आहे. ती आपल्यासारखीच माणसे आहेत. त्यामुळे या माणूसपणाचा अनादर करणार्‍या मुंबई जिमखान्याच्या आणि समाजाच्या वतीने मी लक्ष्मी यांची माफी मागतो.


तर यासाठी समाजाच्या आणि विशेषत: राजकारण्यांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे, असे लक्ष्मी यांनी मत मांडले.
खरे म्हणाले,  केवळ कायद्यातच नव्हे तर मानवी दृष्टीकोनातही बदल होणे गरजेचे आहे. 


आता ही मानवी हक्काची लढाई आम्ही थांबवणार नाही, असा निश्चय करताना लक्ष्मी म्हणाल्या, मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी मुंबई जिमखान्याचे सीईओ, कलेक्टर आणि पोलीस कमिशनरला नोटीस पाठविली आहे. तृतीयपंथीयांची हेळसांड आणि शोषणाविरुद्ध आम्ही लढा सुरूच ठेवणार आहोत.


खरे म्हणाले, मानवी हक्कांसाठी आम्हाला दरवेळी कोर्टात धाव घ्यावी लागणे हेच दुदैर्वी आहे. त्यामुळे याबाबतचे अगदी प्राथमिक शिक्षण देण्याचे काम करावे लागणार आहे.


देशपांडे म्हणाले, हे चित्र बदलण्यासाठी सगळ्यांनी मदत करणे आवश्यक आहे. त्यासाठी कुटुंब, मित्रपरिवारापासून सुरुवात करावी लागेल.


चर्चेचा शेवट करताना 'आयबीएन-लोकमत'चे संपादक निखिल वागळे म्हणाले, माणसांच्या हक्कांची पायमल्ली करण्याचा अधिकार कोणालाही नाही. कारण आपण मानवी हक्कांची सनद स्वीकारलेली आहे.


चर्चेच्या सुरुवातीला समलैंगिक / तृतीयपंथी व्यक्तींच्या मानवी हक्कांची आपल्या देशात पायमल्ली होतेय का? या प्रश्नाचे उत्तर 50 टक्के लोकांनी 'होय' असे दिले. पण चर्चा ऐकल्यानंतर 81 टक्के लोकांनी या लोकांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याचे मत नोंदवले.

source IBN LOKMAT http://im.ibnlokmat.tv/showvideo.php?id=99522

No comments:

Post a Comment